ठेवा
लेखन – राजश्री तिखे
पावरा भाषा सहाय्य – नाना पावरा

एकदाचं प्रदर्शन संपलं. मी सगळ्यांबरोबर हॉलमधे गेलो आणि वर्गाच्या रांगेत सगळ्यात मागे खाली मान घालून बसलो. शरमेनं कुठं बघूच नाहीसं वाटत होतं. डोळे गरम झाले होते आणि केव्हाही रडू येईलसं वाटत होतं. ‘आपण या मागास समाजात जन्माला आलो नसतो तर आजची फजिती वाट्याला आली नसती.’ ‘पोरगं अभ्यासात चांगलंय, नामांकित शाळेत घाला’ असा आग्रह सरपंचांनी केला म्हणून बाबाने आधीच्या मराठी शाळेतून काढून या इंग्रजी शाळेत घातलं. ‘पण आपण या नामांकित शाळेच्या लायकीचेच नाही.’  अशा हजार विचारांच्या इंगळ्या डसून मनाची आगआग होत होती. 

मागच्या आठवड्यात सर वर्गात आले आणि त्यांनी सांगितलं, “७५व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आपण आपली संस्कृती जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपल्या शाळेत ‘आजी-आजोबांचा ठेवा’ या विषयावर प्रदर्शन आयोजित करणार आहोत. या शनिवार-रविवारी सगळ्यांनी घरी जाऊन आपापल्या आजी-आजोबांकडून त्यांनी जपलेली मूल्यवान वस्तू घेऊन यायची आहे.”

मी घरी यायच्या आधीच खचलेलो होतो. आमच्या घरी काय मूल्यवान असणार? आपल्या डायलाई अन् डायबाबाला तर मराठी भाषा पण बोलता येत नाही, त्यांना ‘ठेवा’ म्हणजे काय हे कसं कळणार? दुसऱ्या दिवशी सकाळी उठून ब्रशवर कोलगेट घेऊन पडवीत गेलो, तेव्हा पडवीच्या टोकाला डायलाई चांदी बकरीच्या परवाच जन्मलेल्या कोकराला कुरवाळत होती. डायबाबा जंगलात जायच्या तयारीत होता. त्याला दिवसातून एकदा तरी जंगलात फिरून आल्याखेरीज चैन पडत नाही. 

“वनेश भाकर झालीय. नाष्टा करून घे,” आईची हाक आली. आता भाजी-भाकर हा कुठं नाष्टा असतो का? तेही जमिनीवर पालकट घालून बसायचं अन् थाळीत खायचं. माझ्या शाळेत डायनिंग टेबलवर बसून पोहे, उप्पीट, इडली-सांबार नाहीतर कॉर्न फ्लेक्स असा पौष्टिक नाश्ता खायला देतात. नाहीतर घरी – मक्कीनी रोटी अन् उडदनी दाल. यात काय पौष्टिक आहे? मी नाक मुरडलं आणि तिथंच चेहरा पाडून बसून राहिलो. अलिकडे घरी आलो तरी परकं परकंच वाटतं. आपलं घर, आपला पाडा, इथलं सगळंच आपलं म्हणायला नकोसं वाटतं.

“वनश्या, काह मुय उतार रोयलू?” डायबाबाने विचारलं. “वनश्या, का रं चेहरा का उतरला?” डायबाबाने विचारलं.

“काहीज नी रा.” मी “काय नाय.” मी

“काह नी? काय तिङी ओय़लोज सेरा.” “नाय कसं? कायतरी बिनसलं हाय.”

मग डायबाबाला प्रदर्शनाचं सांगितलं. 

“ठेवा? तेवी काय रा?” त्यानं विचारलंच.

मी कपाळावर हात मारला. मला वाटलंच होतं. “अरं ठेवा म्हंजे......” मला समजेना कसं सांगावं ते. “म्हंजे जुनं, महत्वाचं. जुनं असलं तरी ठेवलेलं... टाकून नाही दिलं ते.” कसंबसं सांगितलं मी. 

“पण डायबाबा पूण तोहपोर काल्लू बियारू से….” मला बोलतानाच रडू यायला लागलं. “पण आज्या तुज्याकडं कुठं काय ठेवा हाय!” मला बोलतानाच रडू यायला लागलं.

डायबाबा काही न बोलता जंगलात निघून गेला.

दुपारच्याला डायलाई आली आणि म्हणाली, “वनश्या, चाल, तोह मी बियारू आपोह.” दुपारच्याला आजी आली आणि म्हणाली, “वनश्या, चल, तुला मी ठेवा देते.”

“उदळूज काह मारी मजा लेतलु.” मी रागावलोच.“उगा चेष्टा करू नको माझी.” मी रागावलोच.

“नी राऽऽऽ. खरीज आपोह ने.चाल,” असं म्हणून ती माळ्यायावर चढायला लागली. “नाय, खरंच देते. चल”, असं म्हणून ती माळ्यावर चढायला लागली.

मागोमाग मीही चढलो. वर खजिना लपवलाय की काय असं माझ्या मनात आलं.

 माझ्या जन्मापासून तशाच बंद असलेल्या, कधी न फोडलेल्या दोन मुटी (कणग्या) तिथं होत्या. त्यातल्या एका मुटीचं कवेलू आज डायलाईनं फोडलं, त्यातनं तिनं मूठभर बारीक दाणे काढले - वरईसारखे. ती म्हणाली, “हा घे ठेवा.” आता मी आणखीच चिडलो.

तशी ती म्हणाली, “यी मोरबंटी – यी बोट्टी मोटली जात से. मार होहरु उरली ओती. एवी कोतराक वरिह ओय गया. मुटीमा समालिण मेकला ओथा. काल पोळहे तेवी पोट भोरणेह काम आव्हे कोरीन २५-३० वरिह ओय गया, बाबू समालिण मेकलू मुटीम.” तिनंच हातानं बनवलेल्या एका मातीच्या वाडग्यात ती मोरबंटी घालून मला दिली.तशी ती म्हणाली, “ही मोरबंटी – वरीचीच जात हाय. माज्या सासऱ्यानं पेरली होती. आता कितीक वरसं झाली. त्या वरसी या कणगीत भरली ती अजून जशीच्या तशी हाय. कधी दुष्काळ पडला तर पोट भरायला कामी येईल म्हणून २५-३० वर्षं कणगीत जपून ठेवतात ही मोरबंटी. हा ठेवाच हाय रं आपल्या वाडवडलांचा.”

संध्याकाळी डायबाबा आला. त्याच्या हातात घंटीसारखी फळं होती आणि गोल पानं.

“यु ले बियारू...” तो म्हणाला, “यो मोखान झाड वार कामोम अवतलो से. एरी भाजी बोनावीण खातला. आपु पाये दुखतला, मूड दुखतलं, डील दुखतलं तेतार खूप कामोम अवतलो. वासडाह चारू ओयजातलू ओहला. ओहला कोतराक झाडे ओयतोत बोयडामा योबिते बियारूज सेने बाबानू मेकरोयला च्यू.” “हा घे ठेवा.” तो म्हणाला. “हे मोखाचं झाडं बहुउपयोगी. याच्या पानांची भाजी खातो आपण. सांधे दुखत असतील, अंग किंवा डोकं दुखत असेल तर फार उपयोगी. उन्हाळ्यात थंडावा देतं हे झाडं. गुरांना चारा म्हणून पण उपयोगी पडतं. अशा कितीतरी गोष्टी जंगलात आहेत. ठेवाच आहे तो आपल्या वाडवडलांचा.”

“आपु तो जंगलन राजा से रा पुऱ्या. आपोणो खाणो आपुज पाकळतला. मुऱ्या, डुडा आपणा ४-५ एकर खेतोम पकतलो. खोलीमा आई-डाईलाई भाजूपालू लागाडतला. तेल लोंगोण आपु मुवडीनं डुल्यानं घरूज पाडतला. आंबा, जामफल, आवल, हेगवा, जांबला, बुरे, कोतरा तेबी फोले आपुह जुडतला. साले ते आपुह डोंगरम जुडजातला बोजारवालान मुय बालणेन गरज निमदे.…..” डायबाबा कितीतरी बोलत राहिला. “आपण तर जंगलचे राजे आहोत पोरा. आपलं जेवण आपणच पिकवतो. तांदूळ, मका आपल्या ४-५ एकर शेतीत पिकतं. परसात आई आणि माडी भाजीपाला करतात. तेलसुद्धा आपण टोळंबीचं बियांचं घरीच काढतो. आंबा, पेरू, पपई, आवळा, शेवगा, जांभूळ, बोरं, किती-किती फळं बक्कळ मिळतात. औषधं जंगलात मिळतात. आपल्याला बाजारचं तोंड पाहण्याची गरजच नाही…” आजा कितीतरी बोलत राहिला.

त्या दोन्ही वस्तू घेऊन शाळेत आलो पण खूप लाज वाटत होती. वर्गातल्या कोणी-कोणी कित्येक नवलाच्या वस्तू आणल्या होत्या – नक्षीदार अडकित्ता, पानदान, जुन्या पद्धतीचा दिवा, पितळी खलबत्ता, बोरू आणि दौत, भरजरी शालू, फेटा, जुनी पुस्तके - कितीतरी अप्रूपाच्या, छान दिसणाऱ्या वस्तू. माझ्या वस्तू पाहताना सरांनाही दया आली. दिलदारपणे म्हणल्यासारखं ते म्हणाले, “तुला आपण त्या कोपऱ्यातले टेबल देऊ या हं.” 

प्रदर्शनाच्या दिवशी कोपऱ्यातल्या टेबलावर उभं राहताना मला कसंनुसं होत होतं. माझ्या टेबलावरच्या वस्तू लांबनच पाहून फार कोणी टेबलकडे येतच नव्हतं. सुरुवातीला मलाही बरंच वाटलं. इथं येऊन हसं होण्यापेक्षा न आलेलंच बरं. नंतर मात्र इतरांच्या टेबलावरची गर्दी पाहून मन जड झालं. का हे माझ्या वाट्याला? 

शेवटी कार्यक्रमाचे पाहुणे आणि त्यांच्याबरोबर मुख्याध्यापक सर सगळ्यांची टेबलं पाहत माझ्या टेबलवर आले. आमच्या सरांचा चेहरा पण कसानुसा झालेला होता. “सांग बाळ तू काय ठेवा आणला आहेस?” पाहुण्यांनी हसत विचारलं. मला आधी काही सुचेनना. कुठून तरी अवसान आलं आणि मी बोलायला लागलो. “ही मोरबंटी... २५ वर्षांपूर्वीचं वाण आहे...... हे मोख...” डायलाई आणि डायबाबाकडून ऐकलेलं सगळं बोलूनच मी थांबलो. पाहुण्यांनी सगळं मन लावून ऐकलं. 

आता बक्षीस समारंभात पाहुणे बक्षीसं जाहीर करत होते आणि मी मागे बसून विचार करत होतो. मला नावं, टाळ्या काहीच ऐकू येत नव्हतं. तेवढ्यात वैजानं मला धरून गदागदा हलवलं. “वन्या, तुला पहिलं बक्षीस भेटलं.” मी दचकलो - एकदा वैजनाथकडे आणि एकदा स्टेजच्या दिशेने पाहू लागलो. तेवढ्यात पाहुण्यांचे शब्द कानावर पडले, “वनेशने आणलेल्या वस्तू खऱ्या अर्थाने आजी-आजोबांचा ठेवा आहेत. फक्त वनेशकरता नाही तर आपल्या सर्वांकरता. दुष्काळासारखं संकट आलं तर जगायला उपयोगी अशी ही ठेव त्याच्या आजी-आजोबांनी जपून ठेवली आहे. आपल्या देशातले कित्येक आदिवासी, ग्रामीण समाज आजसुद्धा निसर्गाशी सुसंगत जगत आहेत. त्यांचं ज्ञान, त्यांची जगण्याची पद्धत आपल्याला समजून घेऊन शिकावी लागणार आहे. तरच ही पृथ्वी पर्यावरण ऱ्हासाच्या संकटातून वाचू शकेल…” ते बरंच काही बोलले.

माझ्या डोळ्यांतून पाणीच यायला लागलं. माझ्याकडे खरंच केवढा मोठा ठेवा होता, हे पहिल्यांदाच मला कळलं. माझी खरी ओळख मला मिळाली.