भाग 2 सकाळी 5 चा गजर लावला होता. 7ला तरी पर्वती चढायला सुरुवात करायची असा विचार होता. सकाळी गजर वाजला तरी कोणी ढिम्म हाललं नाही. हारूतो एकटा उठला. आई-बाबा, आजी बाकीची मंडळी आधीच उठली होती. आलोकदादानी नेहेमीप्रमाणे तोंडाचा पट्टा आणि लाथांचा वर्षाव करून आम्हाला उठवलं. आम्हाला लाथा खाताना बघून हारूतो मनापासून हसत होता. मला इतका भयंकर राग आला. पाहुण्यांसामोर तरी धड वागता येऊ नये का याला ? हारूतो हा प्रमुख पाहुणा असल्याने प्रत्येक गोष्टीत त्याचा नंबर पहिला! अगदी टॉयलेटला जाताना सुद्धा! आमचं टॉयलेट त्याच्यासाठी फारच वेगळं असल्यामुळे काकानी त्या दोघांना चक्क प्रशिक्षण दिलं. आणि हे लोकही अगदी कान देऊन ऐकत होते. मला वाटलं आता हे पण डायरीत लिहून घेतात का काय! आमची पलटण दारामागून गंमत बघत होती. “नो बाथटब?” हारूतोनी काकाला विचारलं. नो ! वी आर हॅप्पी विथ धिस!” काका बादलीकडे बोट दाखवत म्हणाला. आणि स्वत:च स्वतः च्या विनोदावर मोठ्यांदा हसला. त्यांना फारच आश्चर्य वाटलं. त्यांनी या आधी कधी “बादली सिस्टिम” नी आंघोळ केली नव्हती. “आता काका त्यांना आंघोळीचा पण डेमो देणार का?” नेहा हसून म्हणाली. बावळट आहेस का ग जरा? मी तिच्याकडे वळून म्हणालो. हारूतो ‘सकाळचे विधी’ करून आल्यावर मला त्याला विचारावसं वाटत होतं की काय जमली का बैठक? पण त्याला लाज वगैरे वाटायची म्हणून काही विचारलं नाही. “आय युस्ड बादली, इट्स गुड” बाहेर येताना तो स्वत: च अंगठा दाखवत म्हणाला. तो आंघोळ वगैरे करून, आवरूनच आला होता. (आंघोळ केली की आम्ही टॉवेलवरच बाहेर येतो आणि वायुवेगाने खोलीत शिरतो.) तो बाहेर येईपर्यंत आम्हाला घरगडी म्हणून राबवण्यात आलं. गाद्या उचला, चादरी आवरा, ताटं मांडा, लिंब चिरा. एकही माणूस आईच्या तावडीतून सुटला नाही. तो आल्यावर सगळे नाश्ता करायला बसले. गरमागरम पोहे, पापड, सफरचंदाच्या फोडी आणि आल्याचा चहा! आहाहा ! हे लोक इथेच रहावेत आणि दर रोज आम्हाला अश्या मेजवान्या मिळाव्यात अस मला वाटून गेलं. पुन्हा पोहे कसे बनवतात, भारतीय चहा आणि त्याचा इतिहास, भूगोल सगळं सांगून झालं. त्यांना आपले सगळेच पदार्थ खूप आवडत होते. हे आता भारतीय खाणंच सुरू करतील असं वाटायला लागलं. शाकाहारात एवढे पर्याय असताना त्यांना माहीतच नव्हतं . त्या दोघांनी पोहे त्यावर अगदी लिंबू-बींबु पिळून खोबर कोथिंबीर वगैरे पेरून खाल्ले. त्यानंतर आम्ही अंघोळीसाठी साठी नंबर लावले. 5-5 मिनटात आम्ही बाहेर! फक्त मोठ्यांच्या मनाची शांती म्हणून आम्ही अंघोळ करत होतो. त्यात कुणालाही रस नव्हता. नेहा मात्र सगळ्यांच्या आधी आवरून तयार ! खिसे-खिसे वाली पॅन्ट, टीशर्ट, टोपी, गॉगल, छोटी बॅग, बूट-मोजे अगदी नीट ! हारूतो तिला ‘चॉपस्टिकसनी’ कसं खायचं ते सांगत होता. “बघ कसं गुलुगुलू चाललंय!” अमेय मला म्हणाला. “पोहे खाऊन दाखव म्हणाव त्या काड्यांनी!” “तुला का त्रास होतोए रे? तू पण बोल की जाऊन त्याच्याशी! तुलाही शिकवेल तो.” आलोकदादा मागून त्याचे केस ओढत म्हणाला! “छे! मला का होईल त्रास?” अमेयनी उडवून लावलं. “ए चला लौकर! ऊन वाढायच्या आत वर पोचायचय! उतरा खाली पटापट!” आम्हाला आज्ञा मिळाली. हारूतोचा आदर्श घेऊन आज सगळ्यांनीच कपड्यांकडे बारीक लक्ष दिलं होतं. मी पण वरचं आणि खालचं बऱ्यापैकी जमवून आणलं होतं. “लेट्स गो हारूतो!” मी त्याचा हात धरून उतरायलाच लागलो बाकी मंडळीही निघाली. आई-बाबा, आजी घरीच थांबणार होते. बाकी आवरा यावर आणि जेवणाची तयारी करायला. “आता कुठल्या गाडीत कोणी बसायच यावरून वाद घालत बसू नका. जशी जागा मिळेल तसे पटापट बसून घ्या.” आलोकदादानी दादागिरी चालू केली. काकाच्या आणि आमच्या गाडीत मिळून सगळ्यांना पटापट आत कोंबलं गेलं. मी, नेहा हारूतो, आलोकदादा आणि काका एका गाडीत आणि बाकी मंडळी दुसऱ्या गाडीत अशी आमची पलटण एकदाची गेटमधून बाहेर पडली. रविवार असल्यामुळे तशी फार गर्दी नव्हती. दूधवाले, पेपरवाले आणि अतिउत्साही व्यायामवेडे, सायकलवीर एवढीच मंडळी दिसत होती. हारूतो काचेतून गंमत बघत होता. मध्ये मध्ये जपान बद्दल काय काय सांगत होता. मुख्य रस्त्यावर आल्यावर मात्र गर्दी थोडी वाढली. रस्त्याच्या कडेला भाज्या फळं, फुलं विकणारे लोकं, मोठमोठ्यांदा जवळजवळ रस्त्याच्या मध्येच येऊन भाव सांगणारे लोकं, आत्मविश्वासाने सिग्नल तोडणारे लोकं, उलट्या दिशेनी येऊन हसणारे लोकं, दुभाजकांवर पांघरून वाळत घालणारे लोकं, रस्त्याच्या कडेच्या झोपडपट्यांमधून बाहेरच खाटा मांडून लोळत पडलेले लोकं हे सगळं बघून त्याला धक्के बसत होते. तो काही बोलणार तेवढ्यात एक रिक्षावाला साधारण गाडीला चिकटूनच शेजारी येऊन थांबला. हारूतो छातीवर हात ठेवत आतल्या बाजूला सरकला. जवळजवळ माझ्यावर पडलाच. रिक्षावाला प्रचंड कुतूहलानी त्याच्याकडे पाहत होता. मागे बसलेली त्याची बायको आणि तिच्या लहान मुलाला बोट दाखवून ‘हारूतो’ दाखवत होती. चायनीज पोरगय बघ ते ! अस सांगत होती. चायनीज नाही जॅपनीज आहेत ते ! काकानी माहिती पुरवली. “हा! तेच ते.” ती बाई म्हणाली. सिग्नल सुटला आणि रिक्षावाला सुसाट सुटला. त्यांचं लहान पोरगं अजूनही डोकं बाहेर काढून काढून आमच्याकडे बघत होतं. “ही वॉज धिस क्लोज टु अस !” भेदरलेला हारूतो दोन बोटांनी अंतर दाखवत होता. नंतर पूर्ण अंतर तो साधारण मला खेटूनच बसला होता. जितकं शक्य होतं तितकं खिडकीपासून दूर! पर्वतीला पोचल्यावर आम्ही धडाधड पायऱ्या चढायला सुरुवात केली. पण आमचे पाहुणे मात्र पायऱ्यांच्या कडेला बसलेल्या फूल विक्रेत्यांकडे आकर्षित झाले. झेंडूच्या फुलांच्या डोंगरांचे सगळ्या बाजूंनी फोटो काढून झाले. किरेई !!!! किरेई म्हणत त्यांच्या अगम्य भाषेत बडबड चालू होती !. “काहीही आवडतं या लोकांना!” अमेय म्हणाला !. “आय विल शो धिस टु माय वाइफ. शी लवस फ्लॉवर्स !” अस म्हणत हारूतोच्या बाबांनी थोडी फुलं खरेदी केली. आणि हजारची नोट पुढे केली. सुट्टे सुट्टे ! फूलवाल्या आजी म्हणाल्या. “ शी वॉन्टस चेंज “! आलोकदादानी तत्परतेनी भाषांतर केलं. 80 रुपये झाले होते! ते दोघं आश्चर्यचकित झाले ! फक्त 80 रुपये??? त्यांच्यासाठी इथलं सगळं खूपच स्वस्त होतं ! पर्वती चढताना अनेक ठिकाणी थांबून फोटो सेशन केलं गेलं. एवढं जुनं, दगडांच बांधकाम, मंदिर, संग्रहालय सगळ्या गोष्टी ते नीट बघत होते. आम्ही हजार वेळा पाहिलं असल्यामुळे आम्हाला कंटाळा येऊ लागला. आणि वर येता येता वडापाव ची चर्चा झाल्यामुळे डोळ्यासमोर वडापाव दिसू लागला. ह्या दोघांना बाहेरचं खायला घालायचं नाही अशी ताकीद होती पण काकाला थोडी पिन मारली तर तो ही गोष्ट ‘टॉप सीक्रेट’ ठेवेल याची खात्री होती. आमची ‘ट्रीप’ अभ्यास सहलीत रूपांतरित व्हायच्या आत आम्हाला तिथून सटकून वडापाव खायला जाणं गरजेचं होतं. काकाला बाजूला घेऊन मी माझे मनसुबे सांगितले. वडापाव ऐकून काकाचे पण डोळे चमकले. “चलो चलो हो गया हो गया!” म्हणत, त्यांना थातुरमातुर करणं देऊन आम्ही आवरत घेतलं. परत एकदा आमची पलटण गाड्यांमध्ये घुसली आणि आम्ही “वडापाव स्पॉट” ला पोचलो. ‘एकच खायचा आणि घरी चोंबडेपणा करायचा नाही.” असं आपसात ठरवून टाकलं. “ह्यांनाही सांगा. नाहीतर हेच पचकतील.” प्रतीकनी बरोबर मुद्दा सांगितला. मग त्यांना ‘गोडी गुलाबी’ नी ही गोष्ट समजावण्यात आली. आपण कमी खाल्लं तर कसं आईला वाईट वाटेल असं सांगितल्यावर त्यांना अगदी पटलच! वडापाव खरंतर त्यांच्यासाठी तिखट होता पण डोळे पुसत त्यांनी तो संपवला. अर्थातच त्यामुळे तळलेली मिरची आणि लसूण चटणी खाण्यासाठी आग्रह करायचा आगाऊपणा कोणी केला नाही. हे दोघं जर आजारी पडले असते तर आम्ही बाहेर काही ना काही चरलं आहे हे ओळखायला आईबाबांना 1 मिनिटंही लागलं नसतं. ‘क्लीन चिट’ ठेवण्यासाठी रात्री त्यांना हळूच एक पाचकवटी खायला घालायची असं मी आणि काकानी ठरवल. तिथे उभं राहून वडापाव खायला जाम मजा येत होती. आम्ही तळलेल्या मिरच्या कचाकच चावत होतो आणि हे दोघं एकेका घासाला रुमालानी डोळे पुसत होते. आजूबाजूची लोक आमच्याकडे विचित्र नजरेनी पाहत होती. जणू काही आम्ही त्यांना धमकी देऊन वडापाव खायला लावत होतो. वडापाव नंतर 1-1 कटींग चहा मारावाच लागला. आणि व्हायचं तेच झालं. त्या दोघांना घरी आल्यावर पित्त झालं. एवढ्या तिखट, तेलकट पदार्थांची त्यांना सवय नव्हती. त्यांचे चेहरे लालेलाल झाले होते. संध्याकाळचा लक्ष्मी रोड ला जाऊन खरेदी आणि पाणीपुरी चा प्लॅन त्यामुळे रद्द करावा लागला. अर्थातच आई-बाबानी मलाच धरलं. काकानी पण आयत्या वेळी माझ्यावर ‘गेम’ केला. माझ्या, इच्छेमुळे सगळ्यांनी वडापाव खाल्ला असं चित्र सगळ्यांनी मिळून तयार केलं. हारूतो नी सारवासारव केली. “वादापावो वॉज गुड. आय अॅम हॅप्पी वी कुड हॅव धिस फेमस डिश!“ त्यानी माझी बाजू घेतली. पण अर्थातच त्यामुळे आईच्या रागावर काही परिणाम झाला नाही. पुरी भाजी, मसालेभात कोशिंबीर असं सगळं असताना ह्या दोघांना तूप मीठ लिंबू भात देण्यात आला. आणि औषध देऊन थोडा आराम करण्याचा सल्ला देण्यात आला. भटकायचा प्लॅन रद्द झाल्याचं दु:ख तर होतच पण त्यांची तब्येत बिघडल्यामुळे मलाही अपराधी वाटलं. त्या दिवशी मग आम्ही सगळ्यांनी सक्तीचा आराम केला. संध्याकाळी अचानक पाऊस सुरू झाल्यामुळे सगळ्यांनाच चुपचाप घरीच बसायची वेळ आली. अर्थातच त्यामुळे गप्पा रंगल्या. सकाळच सगळंच अन्न उरल्यामुळे रात्री काहीच करावं लागलं नाही. चहा आणि त्या बरोबर वेफर्स , चकल्या बाकरवडया असं चरत चरत जपानच्या गप्पा चालू होत्या. हारूतोच्या बाबांना आपला चहा खूप आवडल्यामुळे आजीनी त्यांना तो करायला ही शिकवला. आपली चहा पावडर आणि थोडा खाऊ बांधूनही दिला. हारूतो नी आम्हाला त्याच्या शाळेतल्या गमतीजमती सांगितल्या. आपला वर्ग तिथली मुलं स्वत: च स्वच्छ करतात. काचरापेटी दिसली नाही तर आपला कचरा घरी घेऊन जातात. अभ्यासाइतकंच त्यांच्याकडे खेळालाही महत्व आहे. आमच्याकडे खेळाची आवड नसलेले लोक पी टी च्या तासाला चकाट्या पिटत असतात. पण ह्या लोकांकडे तसं नसतं. सगळ्यांना व्यायामाचं महत्व पटवून दिलं जात असल्यामुळे व्यायाम हा सगळ्यांना बंधनकारक असतो. तसंच पर्यावरण, स्वयंपाक, शिष्टाचार असे अनेक विषय चक्क शाळेत शिकवले जातात. ‘थॅंक यू’ आणि ‘सॉरी’ त्यांच्याकडे खूप वापरलं जातं. आईबाबा, स्वतः चे जवळचे मित्र, नातेवाईक असले काय किंवा अनोळखी असले काय. ते लोक हे 2 शब्द वापरतातच. ते ही अगदी झुकून. कुठल्या प्रसंगात किती झुकायच हे पण ठरलेलं असतं हे ऐकून तर आम्ही चक्रावलोच. नंतर किती तरी महीने आम्ही थॅंक यू म्हणजे ‘आरीगतो गोझाइमास” आणि सॉरी म्हणजे ‘सुमीमासेन’ चा सपाटा लावला. कुणी हे म्हणायचं विसरलं तर निर्दयीपणे त्याच्या पोटात एक गुद्दा मारण्यात येई ज्यामुळे तो आपोआपच कळवळून खाली वाके आणि “आssss ..” असे ओरडतानाच पुढे त्याला रिगातो गोझाइमास जोडून घेत असे जे ऐकायला फारच मजा येई. लक्ष्मी रोड चा प्लॅन रद्द झाला पण त्यामुळे गप्पा भरपूर झाल्या. हारूतो आणि त्याच्या बाबांनी आम्हाला घरासाठी एक सुंदर चित्र दिलं. हातात पंखा घेतलेल्या जॅपनीज बाईचं ते चित्र होतं. कागदासारख्या दिसणाऱ्या कापडावर ते चित्र रंगवल होतं. मागे त्यांच्याकडच्या फेमस ‘साकुरा’ झाडाच्या फुलांचं डिझाईन होतं. आम्हाला प्रत्येकला हारूतोनी एक एक फ्रीज मॅग्नेट दिलं. त्यावर जॅपनीज मंदिरं , बाहुल्या अशी वेगवेगळी चित्र होती. आजीनी सुद्धा एक आठवण म्हणून पितळ्याची गणेशमूर्ती आणि समईची प्रतिकृति दिली. त्यांच्या सजावटीच्या वस्तूंमध्ये भारतीय वस्तूंची भर पडल्यामुळे ते खूप खुश झाले. रात्री अनोखी शक्कल लढवून काकानी सर्वांना ‘पुणे दर्शन’ अशी एक ‘व्हरच्युअल टुर’ घडवून आणली. टीव्ही वर एक तासाभराची डॉक्युमेंटरी होती. त्यात शनिवारवाडा , आगाखान पॅलेस , सारसबाग, लक्ष्मीरोड, तुळशीबाग,a सिंहगड अश्या अनेक ठिकाणचे फोटोज्, व्हीडियोज् आणि माहिती असं सगळंच होतं. हे सगळं बघता न आल्याचं दु:ख थोडं कमी झालं. ही आयडिया चांगली झाली. सगळ्यांच्या तोंडांना थोडा आरामही मिळाला. 2 दिवस अखंड बडबड चालली होती. गाद्या घालताना मी हारूतोला ‘सॉरी’ म्हणालो. शेवटी माझ्यामुळेच त्यांना त्रास झाला होता. ‘प्लीज डोन्ट फील गिल्ती !. वी हॅड अ गुड टाइम टुगेटहेर.” हारूतो माझ्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला. सगळे लोळत लोळत गप्पा मारत होते. “आता बास. त्यांना उद्या निघायचं आहे सकाळी. झोपू दे जरा.” असं बाबानी येऊन सांगितल्यानंतरही थोडा वेळ हसणं- खिदळणं चालू होतं . शेवटी सगळेच पेंगायला लागले आणि एकामागून एक आऊट झाले. सकाळी कुणीही न उठवता आम्ही उठलो. गाद्या-पांघरूणं आवरली. हारूतो आणि त्याचे बाबा बॅगा भरून अंघोळी करून तयार झाले. 2 दिवसात आमच्यात इतकी छान मैत्री झाली होती की आता ते जाणार या विचारानी वाईट वाटत होतं. आईनी शेवईचा उपमा केला होता. आणि हारूतोच्या बाबांची इच्छा म्हणून चहाची अजून एक फेरी झाली. ‘आय वंडर वेदर आय कॅन मेक धिस गुड टी अॅट होम !” ते म्हणाले. जस्ट कीप द व्हीडियो ऑन. आजी विल बी देअर फॉर द डेमो.” आलोकदादा म्हणाला. सोशल मिडिया वर नेहेमी संपर्कात राहायचं असं एकमेकांना सांगून आम्ही सगळे त्यांना निरोप द्यायला खाली उतरलो. दोघांनी आम्हा सगळ्यांना हात जोडून ‘नमस्ते’ ही केलं. गाडी आली. 10-15 वेळ बाय. वी विल मिस यू. असं म्हणूनही कुणाचच निघायचं मन होत नव्हतं. सरतेशेवटी ते लोक गाडीत बसले आणि गाडी निघाली. खिडकीतून तोंड बाहेर काढून हारूतो “सायोनारा!” असं ओरडला. त्याचा हसरा चेहरा माझ्या लक्षात राहिला. ते गेल्यावर आम्ही सगळे वर आलो. सगळ्यांनाच वाईट वाटत होतं. 2 दिवसांचा धिंगाणा एकदम थांबला होता. शांत आणि थोडंसं उदास असं वातावरण झालं होतं. “किती समजूतदार, गोड पोरगा होता नाही! जीव लावून गेला अगदी.” आजी म्हणाली. “हो ना ! आपण पुढच्या सुट्टीत जपानला जायचंच.” मी निक्षून सांगितल. “जरूर जाऊ.” बाबा म्हणाला. “असा एखादा विदेशी मित्र किंवा मैत्रीण असायला पाहिजे प्रत्येकाला. किती काय काय शिकायला मिळतं आपल्याला.” नेहा म्हणाली. आपण सगळे त्याच्याशी बोलत राहू मध्ये मध्ये. प्रतीक म्हणाला. आणि जपानची ट्रीप तर 100 टक्के काढायची आपण सगळे मिळून! मी पुन्हा एकदा जोर देऊन म्हणालो. 2 दिवसात हारूतो नी आम्हाला पार ‘हरवलं’ होतं हे नक्की ! -संज्ञा घाटपांडे-पेंडसे