संपादकीय भूमिका : ही कथा कुल्फी दिवाळी अंकात (2023) प्रकाशित झाली आहे. त्यातील बबन्या या पात्राचे संवाद पश्चिम महाराष्ट्रातील पुण्याजवळच्या खेड्यांत बोलल्या जाणाऱ्या बोलीत आहेत. मात्र एक प्रयोग म्हणून 'हा बबन्या मालवणी बोलणारा असेल तर...' अशी कल्पना करून त्या संवादांचा मालवणी तर्जुमा आम्ही संपादकीय अखत्यारीत करून घेतला. एकच गोष्ट केवळ बोली भाषा बदलल्याने कशी वाटते याचा अनुभव मुलांना मिळावा, अनुवाद करतानाची गुंतागुंत मुलांच्या लक्षात यावी या उद्देशाने हा मालवणी संवाद असलेला अनुवाद इथे निव्वळ एक प्रयोग म्हणून प्रकाशित करत आहोत. तुम्हांला हा प्रयोग कसा वाटला याबद्दल आम्हांला जरूर कळवा.

सायंभरती - भाग १ 

मूळ लेखन : एलिझाबेथ बेअर 
अनुवाद : जितेंद्र वैद्य
चित्रे : मयुख घोष
मालवणी भाषा सहाय्य : मेघना जोशी

हिरकणी रडण्यासाठी घडवलेली नव्हती. तिला जर रडता आलं असतं, तर तिचे अश्रू थंड काचबिंदूंसारखे दिसले असते. ज्वालामुखीपेक्षाही उष्ण अशा शस्त्रांनी तिला पांगळं केलं होतं. त्यांच्या अग्निवर्षावात निर्माण होऊन हळूहळू थंड होत गेलेल्या काचबिंदूंसारखे.

ते अश्रू तिच्या सिरॅमिक शरीरावरून, वितळलेल्या सेन्सर्सच्या आजूबाजूनं खाली ओघळले असते आणि पायाखालचा वाळूवर ठिबकले असते. तसं झालं असतं, तर तिनं ते काळजीपूर्वक उचलून घेतले असते. तिच्या फुटक्या कवचाला आधार देणाऱ्या जाळ्यावर सुंदर चकचकीत वस्तू लटकत होत्या. त्यांत तिनं तेही ठेवून दिले असते.

जर भंगार गोळा करायला कुणी माणसं उरली असती, तर त्यांनी हिरकणीला भंगारात जमा केलं असतं. पण ती शेवटची युद्धयांत्रिका होती. तीन पाय असलेली, अश्रूच्या थेंबाप्रमाणे खाली गोल आणि वरच्या भागात निमुळती होत गेलेली, एखाद्या मोठ्या रणगाड्याएवढी. तिला चिमट्यासारखे दोन मोठाले हात होते आणि डोक्यापाशी आणखी एक लहानसा हात होता. कोळ्याच्या पायासारखा मुडपून ठेवलेला तो हात हिरकणी नाजूक गोष्टी धरण्या-फिरवण्यासाठी वापरत असे. तिचं पॉलिसिरॅमिक कवच तडे गेल्यामुळे कोळ्याच्या जाळ्यासारखं दिसत होतं. दूरवरच्या मालकांनी वाऱ्यावर सोडून दिलेली हिरकणी समुद्रकिनाऱ्यावर खुरडत खुरडत, आपला एक वितळलेला पाय ओढत भटकत असायची.

त्या समुद्रकिनाऱ्यावरच तिला बबन्या भेटला.

#

परतणाऱ्या लाटांबरोबर घरंगळणारे शिंपले हिरकणीच्या वितळलेल्या पायाखालच्याच्या चिखलात अडकत होते. हा एक पाय तिच्या मागच्या पायांच्या जोडीतला असल्यामुळे तिला त्याचा तसा काही त्रास नव्हता. घट्ट पुळणीवर टेकू म्हणून त्या पायाचा उपयोग व्हायचा. पण खडकाळ भागांपासून मात्र तिला दूर राहावं लागायचं .

भरतीच्या रेषेच्या बाजूबाजूनं खुरडताना हिरकणीच्या लक्षात आलं की आपण एकटे नाही, कोणीतरी आपल्यावर नजर ठेवून आहे. तिनं वर पाहिलं नाही. पण तिच्याजवळ निशाणा धरू शकणारे सेन्सर्स होते. त्या सेन्सर्सचा डोळा आपोआप एका खडकाआड लपलेल्या, फाटक्या-तुटक्या कपड्यातल्या एका छोट्याशा आकृतीवर स्थिरावला. तिच्या डोळ्यांच्या जागीही दृष्टी-सेन्सर्स होते. ते मात्र भरतीबरोबर आलेल्या समुद्री शेवाळातून, लाकडाच्या ओंडक्यांतून, थर्मोकॉलच्या कचर्‍यातून आणि समुद्रकाचांतून वाट शोधण्याचं काम करत होते.

हिरकणी किनाऱ्याच्या टोकाशी पोचेपर्यंत तो तिच्यावर नजर ठेवून होता. पण त्याच्याकडे शस्त्र नव्हतं आणि तिच्या अल्गोरिदम्सनी ठरवलं की याच्यापासून आपल्याला धोका नाही.

बरंच झालं. कारण तो ज्या विचित्र आकाराच्या, पण वरून सपाट असलेल्या खडकामागे लपला होता, तो तिला आवडला होता आणि त्या दगडाच्या ठिकऱ्या-ठिकऱ्या करणं तिला आवडलं नसतं.

#

दुसर्‍या दिवशीही तो असाच तिच्याकडे पाहत राहिला. हिरकणीला त्या दिवशी एक चंद्रखडा, काही स्फटिक, लाल-नारिंगी रंगाचं एक खापर आणि लाटांनी घासून-घासून गुळगुळीत झालेल्या काही समुद्रकाचा मिळाल्या. आजचा दिवस चांगला गेला, हिरकणी स्वतःशीच म्हणाली.

#

“काय जमा करतंय गो तू?”

“बुडलेल्या जहाजांवरचे मणी,” हिरकणी म्हणाली. गेले काही दिवस हळूहळू तो तिच्या जवळ-जवळ सरकत होता. आता तर तिच्या मागे-मागे येणार्‍या पाणपक्ष्यांबरोबर तोही तिच्या फरफटणाऱ्या पायानं वाळूतून उकरले गेलेले शिंपले पटापट वेचून आपल्या कमरेभोवती बांधलेल्या फाटक्या जाळ्याच्या पिशवीत टाकत होता. त्याच्यासाठी ते अन्न असणार, तिनं अंदाज केला. आणि खरंच, त्यानं पिशवीतून एक शिंपला काढला. आणि मोडक्या पात्याचा एक चाकू कुठूनसा पैदा करून तो उघडला. तिच्या सेन्सर्सनी तो चाकू तिला फिक्या रंगात दाखवला. म्हणजे शस्त्रच ते, पण तिला इजा करू शकेल असं शस्त्र नाही.

सराईत होत्या त्याच्या हालचाली - शिंपला फोडून, चोखून, कपची फेकून द्यायला त्याला तीन सेकंदंसुद्धा लागली नसतील - पण शिंपल्यातला प्राणी किती लहान होता! त्या छोट्याशा घासासाठी किती ते कष्ट.

तो हाडकुळा तर होताच, पण त्याच्या कपड्यांचीही लक्तरं झाली होती. नि इतर मानवांच्या मानानं लहान आहे हा, हिरकणीला वाटलं. कदाचित अजून पुरती वाढ झाली नसेल त्याची. तिला वाटलं, तो विचारेल, 'कुठली बुडलेली जहाजं?' मग पूर्वी जिथे शहर असायचं, त्या दिशेला ती हात करेल नि सांगेल, “पूर्वी खूप असायची तिकडे.” पण त्यानं तसं विचारलं नाही. त्याच्या प्रश्नाचं तिला आश्चर्य वाटलं.

“काय करतलंस तू ह्येचा?” वाळू चिकटलेल्या हातानंच त्यानं आपलं तोंड पुसलं. मुठीत मोडका चाकू निष्काळजीपणे तसाच उघडा.

“मला हवे तेवढे मणी मिळाले की मग मी त्याच्या माळा करणार आहे.” तेवढ्यात तिला शेवाळाच्या गचपणाखाली काहीतरी चमकल्यासारखं दिसलं. 'मढ्याची बोटं' असं त्या शेवाळ्याचं नाव. तिनं सावकाशपणे आपलं धूड खाली करायला सुरुवात केली. तिचे गायरोस्कोप आता धड चालत नव्हते. त्यामुळे तिला गणितं करून अंतरांचा अंदाज घ्यायला लागत होता.

बहुतेक-माणसाचं-पिल्लू-असलेल्या त्या प्राण्याची नजर तिच्यावर खिळली होती. “नाय. तसा कसा?” ते पिल्लू म्हणालं. “तेचे माळे नाय करूक येवचे.”

“का?” हिरकणीनं आपल्या वितळलेल्या पायावर जपून भार टाकून आपलं धूड आणखी काही डेसिमीटर्स खाली सरकवलं. तिला अजिबात पडायचं नव्हतं.

“तू काय-काय एकठंय केलंय ता मी बगलंय. तेतली प्रत्येक गोष्ट येगळीयेगळी असा.”

“मग?” तिनं विचारलं आणि स्वतःला आणखी काही सेंटिमीटर्स खाली सरकवलं. तिचे हायड्रॉलिक सांधे कुरकुरले. एक ना एक दिवस ते सांधे किंवा तिच्या इंधन सेल्स मोडतील आणि ती वाळूत अशीच अडकून पडेल. खार्‍या वार्‍यात, पावसा-पाण्यात गंजणारा एक पुतळा म्हणून उरेल. एके काळी जलरोधक असलेलं तिचं कवच आता तडकलं होतं.

“ते सगळं मणी नायहंत.”

नाजूक काम करायच्या हातानं तिनं मढ्याची बोटं बाजूला सारली, तशी हळूहळू तो खजिना दिसू लागला. एक छोटासा निळसर-राखी रंगाचा दगड, नि त्यात कोरलेला गुटगुटीत हसऱ्या माणसाचा आकार. पण त्याला भोक नव्हतं. हिरकणी हळूहळू पुन्हा उभी राहिली आणि तिनं ती मूर्ती प्रकाशात धरली. तिला कुठेही तडा गेलेला नव्हता.

हिर्‍याचं टोक बसवलेलं, केसाइतक्या जाडीचं ड्रिल तिनं बाहेर काढलं, दुसऱ्या हाताच्या चिमटीत ती मूर्ती पकडली आणि तिच्या डोक्यापासून पायापर्यंत एक सूक्ष्म भोक पाडलं. मग त्यातून एक तार ओवली, तारेच्या टोकांना पीळ देऊन गाठी मारल्या, पिळून घट्ट केल्या आणि आपल्या फुटक्या कवचावर झुलत असलेल्या इतर मण्यांच्या माळेत ती मूर्ती लटकावून टाकली.

“मग?”

त्या बहुतेक-पोरानं त्याच्या लहानशा बोटानं त्या लहानश्या बुद्धमूर्तीवरची वाळू झटकली आणि ती मूर्ती फुटक्या सिरॅमिक कवचासमोर झोके घेऊ लागली. हिरकणी ताठ उभी राहिली, तशी पोराचा हात मूर्तीपाशी पोचेनासा झाला.

“मी बबनो.”

“नमस्ते. माझं नाव हिरकणी.” हिरकणी म्हणाली.

संध्याकाळी ओहोटी लागेपर्यंत तो बडबड करत तिच्या मागेमागे नाचत होता. तिच्या मागे येणार्‍या सीगलच्या थव्यांमधून भराभर शिंपले वेचत फेसाळ पाण्यात धुऊन, ते कच्चेच खात होता. हिरकणी एकंदरीत त्याच्याकडे फारसं लक्ष देत नव्हती. संध्याकाळ झाल्यावर तिनं तिचे प्रखर दिवे सुरू केले आणि ओहोटीच्या रेषेवर रोखले. खुरडत खुरडत दोन-चारच पावलं पुढे टाकल्यावर तिची नजर आणखी एका खजिन्यावर पडली. एक तुटकी साखळी आणि तीत अडकलेले काही चकचकीत काचेचे मणी. सोन्याचांदीचा वर्ख देऊन गाठवलेले. हिरकणीनं पुन्हा खाली झुकण्याची अवघड प्रक्रिया सुरू केली…

तेवढ्यात बबन्यानं तिच्या पुढ्यात उडी मारली. फाटकी-तुटकी नखं असलेल्या आपल्या कळकट हातानं ती साखळी उचलली. हिरकणी जागीच थबकली आणि थोड्या प्रयत्नानंच तिनं तिचा तोल सावरला. ती त्याच्या हातातून ती साखळी ओढून घेणार आणि त्याला एक फटका मारून समुद्रात ढकलून देणार एवढ्यात तो त्याच्या चवड्यावर उभा राहिला आणि ती साखळी हात लांबवत त्यानं तिच्यासमोर धरली. प्रखर दिव्याच्या प्रकाशात त्याची काळीशार सावली ओल्या वाळूवर पडली होती आणि त्याच्या भुवयांवरचा नि डोक्यावरचा केस न् केस त्या प्रकाशात रेखीवपणे उठून दिसत होता.

“तुज्यासाटी उचलतंय मी ह्या. तुका नको वाकाक,” बबन्या म्हणाला, तशी हिरकणीनं तिचा नाजूक कामासाठीचा हात पुढे केला आणि त्याच्या हातातून हळूच ती साखळी घेतली.

तिनं ती साखळी नीट बघण्यासाठी दिव्याच्या प्रकाशात धरली. चांगली घसघशीत सात सेंटीमीटर लांबीची साखळी नि चार चमकते-टपोरे मणी. मान वर करून ते बघताना तिच्या डोक्याजवळचे सांधे कुरकुरले आणि त्यातून कोरड्या गंजाच्या खपल्या खाली पडल्या.

तिनं ती साखळी तिच्या कवचावरच्या जाळ्यावर बांधली. आणि ती बबन्याला म्हणाली, “तुझी जाळ्याची पिशवी दे इकडे.”

बबन्याचा हात त्याच्या कंबरेभोवती बांधलेल्या ओल्यागच्च जाळ्याच्या पिशवीकडे गेला. त्यात त्यानं गोळा केलेले शिंपले आणि छोट्या खुब्या होत्या, त्यातून गळणार्‍या पाण्यानं बबन्याच्या मांड्या भिजल्या होत्या. “माजी पिशी?" तो म्हणाला.

“माझ्याकडे दे.” हिरकणी म्हणाली. वितळलेल्या पायामुळे ती थोडीशी वाकलेलीच होती, पण तरीही बबन्याहून जवळजवळ अडीच मीटर उंच होती ती. तिनं तिचा हात बबन्यापुढे केला आणि तिच्या लक्षात आलं, घाबरलाय तो. बरेच दिवस न वापरलेल्या कुठल्यातरी फायलीतून सिविलियन मानवांशी बोलण्याची पद्धत आठवून ती पुढे म्हणाली. "कृपया. प्लीज.”

बबन्यानं आपल्या गारठलेल्या बोटांनी पिशवीची कंबरेभोवतीची गाठ सोडवली आणि पिशवी तिच्यासमोर धरली. तिनं ती पिशवी तिच्या सेन्सर्ससमोर धरली. थोड्याशाच पाहणीनंतर तिच्या लक्षात आलं, की पिशवी नायलॉनची नाही, सुतीच आहे. मग तिनं पिशवीची घडी करून ती तिच्या दोन्ही हातांत धरली आणि त्या पिशवीला सौम्य ऊर्जेचा मायक्रोवेव्ह झटका दिला.

खरं म्हणजे तिनं तसं करायला नको होतं. त्यानं तिच्या बॅटरीवर ताण पडला असता. आणि तिला तिची बॅटरी रिचार्ज करता येणार नव्हती. आणि तिला हाती घेतलेलं काम पूर्ण करायचं होतं.

करायला नको होतं खरं, पण तरीही तिनं ते केलं.

तिच्या हाताच्या चिमट्यातून वाफ येऊ लागली आणि शिंपले तडातडा उकलू लागले. त्यांच्या अंगच्या रसात आणि पिशवीतल्या समुद्रगवताच्या रसात खरपूस शिजून निघाले. रस बाहेर गळू नये याची जमेल तितकी काळजी घेत तिनं पिशवी त्याच्यासमोर धरली.

“जपून," ती म्हणाली, “खूप गरम आहे.”

त्यानं बिचकत बिचकतच ती पिशवी घेतली आणि तो तिच्या पायाजवळ फतकल मारून बसला. त्यानं समुद्रगवत बाजूला सारलं, तर आत उकललेले शिंपले चमकत होते. जणू पोपटी शेवाळ्याच्या घरट्यात पहुडलेले चिमुकले हिरे - फिकट केशरी, गुलाबी, पिवळसर, हिरवे आणि निळे. त्यानं जरा भीत-भीतच एकाची चव पाहिली आणि मग तो शिंपल्यांवर तुटून पडला. काही वेळ त्यानं रस चोखल्याचा नि शिंपल्यांच्या कपच्या इकडेतिकडे फेकल्याचा आवाज तेवढा येत राहिला.

“शेवाळंपण खा, त्यात महत्त्वाची पोषकद्रव्यं असतात,” ती म्हणाली.

#

भरती वाढू लागली, तशी पाय तोडून टाकलेल्या एखाद्या भल्याथोरल्या खेकड्याप्रमाणे हिरकणी हळूहळू किनाऱ्यावर चढू लागली. काळ्याशार भुंग्याच्या पाठीसारखं दिसणारं तिचं कवच चांदण्यात चमकत होतं. तिच्या कवचाभोवतीच्या जाळ्यावर लटकवलेले खजिन्याचे तुकडे एकमेकांवर आपटून मुठीत खुळखुळणार्‍या खड्यांप्रमाणे मंद आवाज करत होते.

पोर तिच्या मागेमागे येत राहिलं.

“तू आता झोप.” हिरकणी बबन्याला म्हणाली. ते दोघं आता चंद्रकोरीच्या आकाराच्या पुळणीवर, कोरड्या वाळूपर्यंत आले होते. आणि बबन्यानं तिच्या बाजूला बैठक मारली होती. पुळणीच्या मागे भुसभुशीत वाळूच्या टेकड्या होत्या. तिथवर लाटा पोचल्या नसत्या.

तो काहीच बोलला नाही. तिच्या स्पीकर्समध्ये घरघर झाली. स्पीकर्स खाकरून ती म्हणाली, “या टेकड्या भुसभुशीत आहेत. इथे तू सुरक्षित नाहीस. तू टेकड्या चढून वर जा आणि तिथे रात्र काढ.”

बबन्या तिच्या आणखी जवळ सरकला. “पन तू हयच र्‍हवतंस ना.” तो फुरंगटून म्हणाला. “मला माझं कवच आहे. आणि बघ, मला वर चढता नाही येणार.” तिनं तिच्या दोन चांगल्या पायांवर पुढे-मागे होत तिचा वितळलेला पाय पुळणीवर आपटून दाखवला.

“पन तुजा कवाच तर फुटलला आसा.”

“त्यानं काही फरक पडत नाही. तुला वर चढलं पाहिजे.” हिरकणी म्हणाली आणि तिनं बबन्याला तिच्या दोन्ही हातांत उचलून स्वतःच्या डोक्यावर धरलं. तो तारस्वरात किंचाळला. पहिल्यांदा हिरकणीला वाटलं, आपण याला दुखापत तर केली नाही ना? पण तिच्या लक्षात आलं की तो खिदळत होता. तिनं त्याला खडकाच्या एका कललेल्या खोबणीवर ठेवलं आणि म्हणाली, “चढ.”

तिनं टेकडीवर तिचे प्रखर दिवे रोखले. बबन्या सुरूसुरू टेकडी चढून वर गेला.

आणि सकाळी परतला.

#

बबन्याच्या कपड्यांची लक्तरं तशीच राहिली, पण हिरकणीच्या निगराणीखाली त्याच्या अंगावर बाळसं धरू लागलं. तिनं सापळे लावून त्याच्यासाठी समुद्रपक्षी पकडले आणि भाजले, शेकोटी कशी पेटवायची आणि विझू न देता जळत कशी ठेवायची हे त्याला शिकवलं. लहान मानवांना निरोगी कसं ठेवायचं याबद्दल तिच्या ज्ञानसाठ्यामध्ये सापडतील तितक्या युक्त्या त्याच्यासाठी शोधल्या. तो बघता बघता उंच होऊ लागला, कधी-कधी तर दर दिवशी झालेली काही अंश मिलिमीटर्सची वाढ तिच्या नजरेला दिसेही. तिनं समुद्रातल्या वनस्पतींबद्दलची माहिती हुडकून काढली आणि त्याला त्या खाऊ घातल्या, कधी-कधी तर बळं-बळंच. तिला उचलायला अवघड जातील अशा सगळ्या खजिन्याच्या वस्तू तो तिच्यासाठी वेचू लागला. काही मणी सुंदर असले, तरी ते उचलल्यावर हिरकणीचे रेडिएशन दाखवणारे काउंटर्स फिरायला लागायचे. त्यांच्यापासून तिला काहीच धोका नव्हता. पण तरीही तिनं ते न उचलता पुन्हा ठेवून दिले - असं पहिल्यांदाच घडत होतं. आता तिला एक मानवी साहाय्यक होता. आणि त्याला निरोगी ठेवणे हा तिच्या प्रोग्रामचा एक भाग होता.

हिरकणीनं त्याला गोष्टी सांगितल्या. तिचं ज्ञानभांडार प्रचंड होतं. त्यात अवकाशयानं आणि समुद्रसफरीला निघालेली जहाजं होती, तशाच युद्धाच्या कथा होत्या. कशामुळे कोणास ठाऊक, पण बबन्याला त्या गोष्टी सर्वांत जास्त आवडत. युद्धाबद्दलच्या तीव्र भावनांना मोकळी वाट करून देण्याचा त्याचा मार्ग असावा हा, हिरकणीला वाटलं. तिनं त्याला कान्होजी आंग्रे, सावळ्या तांडेल, शिवाजी महाराज, अकबर आणि बिरबल, अडमिरल नाडकर्णी अशाही सगळ्या गोष्टी सांगितल्या. ती एका छोट्या पडद्यावर शब्द प्रोजेक्ट करत असे आणि ते त्याला वाचून दाखवत असे. थोड्याच दिवसांत पडद्याकडे बघून तो तिच्याबरोबर शब्द पुटपुटू लागला. किती थोड्या दिवसांत, याचं तिला आश्चर्य वाटलं.

असा उन्हाळा संपला.

सप्टेंबरची सुरुवात होईपर्यंत तिला हवा तेवढा खजिना मिळालेला होता. फुटलेल्या जहाजांमधून वाहून आलेले खजिने अजूनही किनाऱ्यावर येत राहिले आणि बबन्या त्यांतले निवडक खजिने तिच्यासाठी वेचून तिला आणूनही देत राहिला. पण एके दिवशी हिरकणीनं तिच्या आवडत्या चपट्या दगडाजवळ ठिय्या मारला आणि त्यावर आपल्या खजिन्यातल्या सगळ्या वस्तू मांडल्या. तिनं जमवलेले पितळी तुकडे एका साच्यात घालून त्यातून पितळाची तार तयार केली. तिच्या खजिन्यातल्या चमकदार वस्तूंपासून तयार केलेले मणी त्यात ओवले. साखळ्यांचे तुकडे एकमेकींत गाठवून त्यातून माळा तयार केल्या.

तिला बऱ्याच गोष्टी शिकाव्या लागल्या. सुरुवातीला तिची सौंदर्यदृष्टी तितकीशी तयार नव्हती. त्यामुळे ती कितीतरी माळांच्या जोडण्या मांडून बघायची आणि न आवडून त्या विस्कटून टाकायची. पुन्हा नव्यानं सुरुवात करायची. आकार आणि रंग तर एकमेकांशी मिळतेजुळते असायला हवेच होते, पण काही तांत्रिक अडचणीही होत्या. सुरुवातीला मण्यांचं वजन एकसारखं नव्हतं, त्यामुळे साखळ्या तिला हव्या तशा डौलदारपणे रुळायच्या नाहीत. मग साखळ्यांच्याच्या कड्यांना वळ्या पडून त्या एकमेकींत गुंतायच्या तरी वा त्यांची कड्यांची टोकं सुटी राहून टोचरी तरी व्हायची. त्या सगळ्या सोडवून पुन्हा नव्यानं कराव्या लागल्या.

ती कित्येक आठवडे काम करत होती. तिच्या मानव सहकार्‍यांना स्मारकं महत्त्वाची वाटत. तिला स्वतःला मात्र त्यामागचा तर्क कधीही समजला नव्हता. तिच्या सहकाऱ्यांसाठी कबरी बांधणं तिला शक्य नव्हतं. पण ती बबन्याला ज्या गोष्टी वाचून दाखवत असे, त्यांचा तो एखाद्या मांजरानं दुधाचा पाडावा, तसा अधाशीपणे फडशा पाडत असे. ते बघून, तिला शोक-दागिन्यांची कल्पना सुचली. तिच्याकडे तिच्या मानवी सहकार्‍यांची काहीही वस्तुरूप आठवण नव्हती. एखादी केसाची बट किंवा त्यांनी घातलेल्या कपड्याची एखादी चिंधीही नव्हती. पण फुटलेल्या जहाजांतून आणि कोसळलेल्या अवकाशयानांतून वाहून आलेल्या खजिन्याचे दागिने नक्कीच त्यांची जागा घेऊ शकतील असं तिला वाटलं.

तिच्या मनात फक्त एकच शंका होती. हे शोकदागिने घालेल कोण? खरे म्हणजे ते मृत व्यक्तींच्या कुणा वारसाकडे गेले पाहिजेत. गेलेल्याबद्दल ज्यांच्या मनात मऊ आठवणी आहेत, अशा कुणा लोकांकडे. तिच्या ज्ञानभांडारात तिच्या सगळ्या मानव सहकाऱ्यांच्या वारसदारांची नावं होती. पण त्यांतलेही किती जण जगले-वाचले हे तिला ठाऊक नव्हतं. आणि जरी वाचले असले, तरी त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा तिच्यापाशी काही मार्गही नव्हता.

सुरुवातीला बबन्या तिच्या भोवती भोवती राहिला. “आमी फिराक जावया ना!”, अशी तिची मनधरणीही त्यानं करून पाहिली. पण हिरकणीनं त्याला अजिबात दाद दिली नाही. तिच्या मुख्य बॅटरीमधली ऊर्जा खूपच कमी झालेली होती. आणि आता येऊ घातलेल्या हिवाळ्यातल्या मंद सूर्यप्रकाशात तिची सौर बॅटरीसुद्धा फारशी चार्ज होऊ शकणार नव्हती. त्यात सध्याचा हिवाळा म्हणजे वादळं आलीच. आणि मग तो खवळलेला दर्या आपल्याला दूर ठेवता येणार नाही हे तिला माहिती होतं.

ते व्हायच्या आधी हे स्वतःला नेमून दिलेलं शेवटचं काम पूर्ण करायचा तिचा निर्धार होता.

बबन्या तिच्याशिवाय हिंडायला लागला. स्वतःचे स्वतः सापळे लावून तो पक्षी पकडून आणायला लागला आणि शेकोटी करून ते भाजून खायलाही लागला. हे चांगलं होतं. त्याला स्वतःची स्वतः काळजी घेणं शिकायलाच हवं होतं. रात्रीच्या वेळी मात्र तो तिच्याशेजारी येऊन बसायचा. तिच्या दगडावर चढून तिला मण्यांची वर्गवारी करण्यात मदत करायचा आणि तिच्याकडून गोष्टी ऐकायचा.

एकीकडे हातांनी मणी आणि तारा जुळवून माळा करण्याचं काम आणि एकीकडे बबन्याला ती सांगत असलेल्या युद्धाच्या गोष्टी - एकाच वेळी चालणार्‍या या दोन्हींमधला समान धागा म्हणजे युद्धात धारातीर्थी पडलेल्या सहकार्‍यांच्या आठवणी सन्मानानं जपण्याचं कर्तव्य. पण आता काल्पनिक कथा किंवा इतिहासातल्या गोष्टी न सांगता हिरकणी गोष्टींत स्वतःचे अनुभवही गुंफू लागली होती. रेश्मा शेलारनं जुन्नरजवळ एका लहान पोराला कसं वाचवलं त्याची गोष्ट तिनं त्याला सांगितली. आणि रत्नागिरीजवळ शत्रूनं खोटं आमिष दाखवून युद्धयंत्रं त्यांच्या जागेवरून बाहेर काढली, तेव्हा लेफ्टनंट असलम पठाणनं स्वतःवर सर्व अग्निवर्षाव कसा ओढवून घेतला आणि कॅप्टन इरावती आंग्रेचा जीव कसा वाचवला त्याचीही.

बबन्या या गोष्टी जिवाचा कान करून ऐकत होता. जरी सगळे तपशील तो बरोबर सांगत नसला, तरी सगळ्यातला गाभा त्याला बरोबर समजत होता आणि त्याला सांगताही येत होता हे पाहून हिरकणी चकित झाली. बबन्या बुद्धिमान होता. यंत्राइतका नसला, तरीही.

#

एका दिवशी बबन्या किनारपट्टीवरून फिरत फिरत तिच्या दृष्टीच्या टप्प्यापलीकडे गेला असताना हिरकणीला त्याच्या किंचाळ्या ऐकू आल्या.

ती बऱ्याच दिवसांत तिच्या आवडत्या दगडापासून हललेली नव्हती. वितळलेल्या पायावर भार ठेवून, जरा अवघडल्यासारखीच उभी राहून ती दगडावर पसरलेल्या माळांवर काम करत होती.

तिच्या धड पायांवर ती एकदम उभी राहिली, आणि तारा, खडे आणि काचेचे तुकडे इकडे-तिकडे उधळले गेले. पण तिला त्याची फिकीर नव्हती. पहिल्याच प्रयत्नात उभं राहता आल्याचं बघून तिला स्वतःचंच आश्चर्य वाटलं. गायरोस्कोप्स कामातून गेलेले असल्यामुळे तिला तोल सांभाळायला त्रास होत होता.

बबन्याची किंचाळी पुन्हा ऐकू आली, तेव्हा तिचा जवळ-जवळ तोलच गेल्यासारखा झाला.

चढणं अशक्य होतं, पण हिरकणीला अजूनही पळता येत होतं. वितळलेला पाय तिच्या मागून ओल्या वाळूत रेघ ओढत होता. वेळ भरतीची होती, त्यामुळे तिला खार्‍या पाण्यातून जाणं भाग होतं. त्या पाण्यानं गंज वाढला असता, पण तिला आता त्याची पर्वा नव्हती.

तिनं ज्या दगडांच्या मागे जाताना बबन्याला बघितलं होतं, त्या दगडांच्या मागे ती एखाद्या वाघिणीसारखी पोहोचली. तेव्हा दोन मोठे मानव बबन्याला जमिनीवर आदळताना तिला दिसले. एकाच्या हातातला मोठा सोटा त्यानं बबन्यावर उगारला होता आणि दुसरा बबन्याच्या कंबरेची पिशवी हिसकावून घेऊ बघत होता. सोटा बबन्याच्या मांडीवर पडला आणि बबन्यानं आणखी एक किंचाळी फोडली. मायक्रोवेव्ह प्रोजेक्टर्स वापरण्याची हिरकणीची हिंमत झाली नाही.

पण तिच्याकडे इतर शस्त्रं होती. एक पिनपॉइंट लेझर आणि स्नायपर म्हणून वापरता येईल अशी एक रासायनिक बंदूक. हे मानवी शत्रू हरवायला सोपे होते. त्यांनी चिलखतही घातलेलं नव्हतं.

(क्रमश:)