अवलिया: डेव्हिड ॲटनबरो
लेखन: विशाल व्यास

लंडनच्या प्राणिसंग्रहालयासाठी लहानमोठे प्राणी गोळा करायला प्राणीशास्त्रज्ञांच्या मोहिमा जात असत.बीबीसीमध्ये कुणीतरी अशी कल्पना मांडली की त्यांच्याबरोबर आपला काही स्टाफ पाठवावा, प्राण्यांचं शूटिंग करायचं, त्यांच्या नैसर्गिक वातावरणात. याआधी कुणीही असलं काही केलेलं नाही, कसं करायचं ते माहीत नाही. लाईट, लोकेशन, कॅमेरा काहीही माहिती नाही, मुळात वाईल्डलाईफ फोटोग्राफी किंवा शूटिंग असा काही शब्दच इंग्रजी भाषेत अद्याप नाही. मग असल्या लफड्यात पडायला कोण तयार होणार!!

मग त्यांनी बीबीसीतला सगळ्यात ज्युनियर पोऱ्या पकडला, 28 वर्षांचा,  नुकतंच नोकरीला लागलेला पोरगा. त्याला सांगितलं, “जा रे पोऱ्या ‘सिएरा लिओन’ नावाच्या आफ्रिकेतल्या देशात, कॅमेरामन तुझा तूच शोध, आणि जा लंडन प्राणिसंग्रहालयाच्या स्टाफबरोबर.”

 
 

त्या पोऱ्यानं एक हौशी कॅमेरामन पकडला. दोघेही तरुण आणि वयाला साजेश्या उत्साहाने आणि अविचाराने भरलेले. आपण काय अंगावर घेतोय, त्यात काय अडचणी येऊ शकतात याचा विचारच केला नव्हता त्यांनी. जुजबी तयारी करून, कॅमेरा, फिल्म्स, काही कपडे, औषधे आणि इतर साधने घेऊन हे निघाले. १९५४ सालात, वाहतुकीची साधने नीट नाहीत, संपर्काची साधने नीट नाहीत, मोबाईल वगैरे तर शोधच लागायचे होते अजून. पण तरीही उत्साहाने आणि चिकाटीने हे पोचले 'सिएरा लिओन' या पूर्व आफ्रिकेतल्या दुर्गम देशात. प्रत्येक खेड्यात जायचं, तिथल्या लोकांना आपण का आलोय हे समजावून सांगायचं. त्या खेड्याच्या मुखियाने यांच्या स्वागतासाठी नाच, उत्सव आयोजित केले त्यात सहभागी व्हायचं, आणि प्राणी गोळा करायचं आणि चित्रीकरण करायचं आपलं काम सुरू ठेवायचं. 

काय काय अडचणी आल्या या मोहिमेत. प्राणी चावून, झाडावरून पडून होणारे अपघात रोजचेच, कुणी प्रचंड आजारी पडायचं, नीट उपचार घ्यायला डॉक्टर अस्तित्वातच नाहीत. एकदा एका लहानश्या बोटीने समुद्रातून जाताना, रस्ता चुकल्यामुळे महिनाभर अडकून पडावं लागलं बोटीवरच. पण एवढ्या अडचणीतूनही या पोरांनी ते चित्रीकरण पूर्ण केलं. बरेच दुर्मिळ प्राणी पहिल्यांदाच जगाला पाहायला मिळाले. स्थानिक चालीरीती, संस्कृती, नाच, संगीत हे सगळंही पहिल्यांदाच जगासमोर आलं. 

या फिल्म्स नंतर बीबीसीवर दाखवल्या गेल्या. प्रचंड लोकप्रिय झाल्या त्या. त्यानंतर या दोघांनी या मोहिमा सुरूच ठेवल्या १९५४ ते १९६३ पर्यंत. पण या फिल्म्समुळे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट झाली. झाडे, पाने, फुले, किडेमुंग्या, प्राणी, पक्षी यांचं आयुष्य किती जादूचं आहे, भन्नाट आहे हे जगासमोर आलं. या सगळ्यावर अभ्यासपूर्ण आणि मनोरंजकही डॉक्युमेंट्री बनवता येतात हे सर्वांना कळलं. हे बनवणारा जादुगार पहिल्यांदा जगासमोर आला.

त्या बीबीसीमधल्या नवशिक्या २८ वर्षाच्या पोऱ्याचं नाव डेव्हिड ॲटनबरो ,  साल 1954.... आज डेव्हिड फक्त ९३ वर्षांचा आहे. केवढं प्रचंड दिलंय या माणसाने आपल्याला!! 1954 साली या माणसाने वाईल्डलाईफ फिल्मची परिभाषा, व्याकरण तयार केलं ते अजून वापरात आहे. त्या भाषेत नॅशनल जिओग्राफिक, डिस्कव्हरी आणि ऍनिमल प्लॅनेट सारखे चॅनल अखंड बडबड करत आहेत. 1954  सालापासून आजपर्यंत म्हणजे तब्बल 65 वर्षे हा ठार वेडा माणूस वाईल्डलाईफ फिल्म बनवतच सुटलाय. तेव्हा कलर फिल्म नुकतीच आली होती, पण टीव्ही सगळीकडे कृष्णधवलच होते, त्यामुळे तेव्हा बनवलेली फिल्म ब्लॅक अँड व्हाइट प्रिंट केले, त्याचवेळी बीबीसीवर ब्रॉडकास्ट पण झाली. मूळ कलर निगेटिव्ह फिल्म तेव्हा गहाळ झाली ती झालीच. गेल्या वर्षी अडगळ साफ करताना संपूर्ण 6 तासाचं निगेटिव्ह ओरीजिनल फूटेज सापडलं बीबीसीला. ती कलर फिल्म परत प्रकाशित केली आहे नुकतीच. - ‘झू क्वेस्ट’

 

1954 सालच्या तरुण डेव्हिड ॲटनबरोला त्या कलर फिल्ममध्ये बघताना नकळत काटा आला अंगावर.. इतिहासाचा जिवंत तुकडा पाहिल्यासारखं वाटलं. डेव्हिड महान आहे.

टिप: ९३ वर्षांच्या तरूण डेव्हिड ॲटनबरो यांची सर्वात अलिकडची फिल्म 'अवर प्लॅनेट' नुकतीच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी आपल्या मुलांना ती जरूर दाखवा.

छायाचित्रांबाबत श्रेयअव्हेर: सर्व छायाचित्रे आंतरजालावरून घेतलेली आहेत. सदर चित्रांचे प्रताधिकार मुळ छायाचित्रकार/बीबीसी/डेव्हिड ॲटनबरो यांच्याकडे सुरक्षित